CM Uddhav Thackeray on Shiv Sena Vardhapan Din : हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे, भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा टेंडर काढा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवरून हल्लाबोल केला. हातात काम नसेल, तर राम राम करण्यात अर्थ नाही, अशी वचन द्यावीत जी पाळता येतील, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. देशातील तरुणांवर ही वेळ का आली? मत म्हणजे आयुष्य असतं, शिक्का नव्हे, अग्निपथ योजना मृगजळ असल्याचे ते म्हणाले. भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारण्यांसाठी सुद्धा टेंडर काढा, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला. 


रंधा मारायला शिकवणार पण नाव अग्निवीर


अग्निपथवरुन देशभरात सुरु असलेल्या हिंसक संघर्षावरून त्यांनी मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. देशातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्यांची माथी का भडकवली गेली ? कोणी भडकवली त्यांची माथी? हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे. हृदयात राम आहेच, पण प्रत्येकाला दाखवता येणार नाही. हाताला काम नसेल तर राम राम करून काहीच फायदा होणार नाही. सुरुवातीला नोटाबंदी झाली. लोकांमध्ये भीती असल्याने निर्णय पचून गेला. शेतकरी कायदे आले, पण नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावे लागले. वचने अशी द्या जी पूर्ण झाली पाहिजेत. शिवसेनेने जे जे वचन दिलं ते पूर्ण केलं आहे. दोन कोटी नोकऱ्या देऊ म्हणाले, पण काहीच दिलं नाही. एखादी योजना आणायची अग्निवीर, अग्निपथ योजना. शिकवणार सुतार काम. गाडी चालवायला शिकवणार. रंधा मारायला शिकवणार आणि नाव अग्निवीर, अशी बोचरी टीका त्यांनी केली. 


शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सूचक शब्दात भाष्य करताना भाजपवर कडाडून हल्ला चढवला.  मला उद्याच्या निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. शिवसेनेमध्ये गद्दार कोणी राहिलेला नाही, राज्यसभा निवडणुकीत मत फुटलेलं नाही


कुणी काय कलाकाऱ्या केला हे कळालं असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. आईचं दूध विकणारा शिवसेनेत नको, असे बाळासाहेबांचे शब्द सांगत  त्यांनी गद्दारी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला. 


आमदारांना हाॅटेलात ठेवणं हीच आजची लोकशाही  


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना हाॅटेलमध्ये ठेवण्यावरूनही भाष्य केले. नाही म्हटलं, तरी आमदारांची बडदास्त ठेवावी लागते, यालाच लोकशाही म्हणत असल्याचे खोचक शब्दात सांगितले. राज्यसभा निवडणुकीत एकही मत फुटलं नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीची चिंता नसल्याचे ते म्हणाले. कितीही फाटाफूट झाली, तरी शिवसेना ताकदीने उभी राहिली आहे. आईचा दुध विकणारा शिवसेनेत नकोत हे बाळासाहेबांचे वाक्य फार महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.