मुंबई : एकीकडे मुंबईत नव्या मेट्रोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिरवा झेंडा दाखवला असला तरी मुंबईचा प्रवास सुकर करणारी कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 या भुयारी मेट्रोला मात्र चांगलाच ब्रेक लागला आहे. फडणवीस सरकारच्या काळात वेग पकडलेल्या मेट्रो 3 चं काम सध्या कारशेडच्या प्रश्नामुळे रखडला आहे. त्यामुळे मेट्रो 3 चा खर्चही वाढलाय आणि सोबतच प्रकल्प पूर्ण होण्याचं लक्ष्यही 3 वर्षे पुढे ढकललं गेलंय.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे मे 2021 अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम 67 टक्के झाले आहे. मात्र, कारशेडबाबत निर्णय झालेला नसल्याने मेट्रो-3 चे भवितव्य अंधारातच आहे. कारशेड निर्णयाच्या विलंबामुळे मेट्रो - 3 ची मुदत साधारण दोन-तीन वर्षे पुढे जाण्याची भीती आहे.
आरेतून कारशेड कांजुरार्गला नेलं तेव्हाच खर्च 300 ते 500 कोटींनी वाढण्याची शक्यता होती. आता प्रकल्पाची किंमत 23 हजार कोटींवरुन 33 हजार कोटींवर गेली आहे. माजी आयुक्तांनी त्याचवेळी सांगितल्याप्रमाणे प्रकल्प पूर्ण व्हायला 2023 उजाडेल. ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेड रद्द करून कांजुरमार्ग येथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कोरोनाकाळात मजूर स्वगृही परतल्याने मेट्रोच्या कामांसाठी मजूरही गावी गेले. तरीही या प्रकल्पातले अनंत अडथळे पार करुन अजुनही मेट्रो 3 चे भुयारीकरणाचे काम सुरुच आहे.
- मेट्रो प्रकल्पाची किंमत या आधीच 23 हजार कोटींपासून 33 हजार कोटींपर्यत आधीच वाढली.
- आरेतील कारशेड रद्द केल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात तिथे जे कारशेडचे काम केले होते त्यासाठीचा खर्च वाया गेला.
- आता पुन्हा कांजुरमार्गचं काम रखडल्यानं पुन्हा खर्च वाढणार आणि प्रकल्पही आणखी लांबणीवर पडणार
- मेट्रो रुळावर धावण्यासाठी 2023 साल उजाडेल.
संबंधित बातम्या :
Metro 2A, Metro 7 : मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा, भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने
MMRDA Work : जेव्हा निर्बंध उठतील तेव्हा आयुष्य गतीमान होण्यासाठी विकासकामं सुरु आहेत : मुख्यमंत्री