मुंबई : मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. कांदिवलीतील आकुर्ली स्टेशनवरुन या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. येत्या ऑक्टोबर महिन्यात पहिला टप्पा सुरु होईल, असं सांगितलं जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होते. तर मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन केलं.


वेस्टर्न एक्स्प्रेसवेवरील वाहतूक 25 टक्क्यांनी कमी होणार : आर ए राजीव, आयुक्त, एमएमआरडीए
"आजचा क्षण ऐतिहासिक आहे. 2014 मध्ये पहिली मेट्रो सुरु झाली होती, त्यानंतर लगेच आपण मेट्रो 2A आणि मेट्रो 7 कडे वाटचाल करत आहोत, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिली. "दोन्ही मेट्रो मार्गावर दररोज एकूण 12 लाख प्रवासी प्रवास करु शकतील. या मेट्रोमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक 25 टक्क्याने कमी होईल. ऑक्टोबरमध्ये पहिला टप्पा सुरु करण्यात येईल, जो 20 किमी असेल. उर्वरित टप्पा जानेवारी 2022 मध्ये सुरु केला जाईल. या मेट्रोला चालकाची गरज नाही, मात्र सुरुवातीला काही दिवस चालक असेल," असंही त्यांनी सांगितलं.


भाजपची मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीविरोधात निदर्शने
दुसरीकडे मुंबईत मेट्रोच्या चाचणीवरुन राजकारण सुरु झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मुंबईत भाजपने आंदोलन केलं. आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात भाजपने आकुर्ली मेट्रो स्टेशनच्या समोर निषेधाचे बॅनर झळकावले. मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण असा प्रश्न भाजपने विचारला. दरम्यान पोलिसांनी अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतलं आहे.


असा असेल नव्या मेट्रोचा मार्ग 


या प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी 12 हजार कोटी प्रकल्पाचा खर्च आहे. त्यापैकी, आतापर्यंत साडेपाच ते सहा हजार कोटी खर्च झाले आहेत. बीईएमएल येथे तयार झालेल्या प्रत्येक कोचसाठी सरासरी 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सरासरी 10 कोटी रुपये खर्च येतात. त्यामुळे ही स्वदेशी कोच निर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरलेली आहे. 


या दोन मार्गांवर जी नवी मेट्रो धावताना दिसेल ती मेट्रो पूर्ण भारतीय बनावटीची आहे. शिवाय ही मेट्रो ड्रायव्हरलेस मेट्रो आहे. मुंबईच्या चारकोप डेपोमध्ये मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चं सध्याचं कारशेड आहे.


कसे असतील नवे मेट्रो मार्ग?
मेट्रो 2A - डीएन नगर ते दहिसर 
18.6 किमी चा मार्ग - तरतूद 6, 410 कोटींची, 2031 पर्यंत 9 लाख प्रवासी प्रवास करतील 


मेट्रो 7 - अंधेरी ते दहिसर 
16.5 किमीचा मार्ग- तरतूद 6,208 कोटींची, 2031 पर्यंत 6.7 लाख लोक प्रवास करतील


या नव्या मेट्रोमुळे मुंबईला काय फायदा?


- 18 ते 20 टक्के वाहतूक कोंडी कमी होईल...


- 10 टक्के लोकलमधली गर्दी कमी होईल...


- अंधेरी ते दहिसरचा प्रवास अवघ्या अर्धा तासात होणार...


- नव्या मेट्रोचा प्रवासही किफायतशीर होणार


- नव्या मेट्रोचं किमान तिकीट 10 रुपये तर कमाल तिकीट 80 रुपये असणार


कसे असतील तिकीट दर?
0-3 किमी -10 रुपये
3-12 किमी - 20 रुपये
12-18 किमी - 30 रुपये
18-24 किमी - 40 रुपये
24-30 किमी - 50 रुपये
30-36 किमी - 60 रुपये 
36-42 किमी - 70 रुपये  
42-48 किमी - 80 रुपये