कल्याण : घरगुती वादातून आपल्या 80 वर्षीय वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. एबीपी माझाने बातमी प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. घरातून कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनीच आयपीसी कलम 323, 324, 504, 506 अंतर्गत गजानन बुवा चिकनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गजानन बुवा चिकनकर यांचा पोलीस शोध घेत आहेत.
मारहाणीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. विशेष म्हणजे घरातील इतर महिला या व्हिडीओमध्ये दिसत होत्या. मात्र कुणीही या मारहाणीला विरोध केला नाही. या मुद्दावरुन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन घरातील महिलांना जाब विचारला.
मारकुट्या आजोबांवर गुन्हा दाखल करा- चित्रा वाघ यांची मागणी
मारकुट्या आजोबांनी आजीला मारहाण केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. मात्र अद्याप आजोबांवर गुन्हा दाखल झाला नाही. हिललाईन पोलीस ठाण्यातील पोलीस त्यांच्या घरी जाऊन आले. मात्र घरच्यांनी कोणीही तक्रार दिली नाही. त्यामुळे सुमोटो गुन्हा दाखल करा आणि आजोबांवर कारवाई करा अशी मागणी भाजपा नेत्या वाघ यांनी केली आहे.
मलंगगड जवळील द्वारली गावच्या हद्दीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका 85 वृद्धाने आपल्या 80 वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. गजानन चिकणकर असे या वृद्ध इसमाचं नाव आहे. हा व्हिडीओ आठवड्याभरापूर्वीचा असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आजोबांविरोधात कारवाई केली आहे.