मुंबई : एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटले. त्यानंतर देशभरातलं वातावरण तापलं आहे. याबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना सवाल केला असता त्यांनी 'मेरा टाईम आएगा' असं उत्तर दिलं आहे.  वाड्रा यांनी आज मुंबईत मुंबादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

राजीव गांधींवर आरोपांचा सपाटा लावणाऱ्या नरेंद्र मोदींना रॉबर्ट वाड्रांनी खरमरीत उत्तर दिले आहे. वाड्रा म्हणाले की, देशभक्ती ही राहुल आणि प्रियंका गांधींच्या रक्तात आहे. आता मीदेखील राजकारण शिकतोय.

दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवीचे दर्शन घेतले. परंतु वाड्रा दर्शनानंतर परतत असताना मंदिराच्या आवारातील काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या.

वाड्रा दर्शन घेऊन परतत असताना ज्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या, त्या लोकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे, म्हणून आम्ही घोषणा दिल्या.

त्यानंतर माध्यमांनी घोषणा देणाऱ्या लोकांना तुम्ही भाजप कार्यकर्ते आहात का? असे विचारल्यावर ते म्हणाले की आम्ही भाजपचे लोक आहोत. परंतु आम्ही स्वतःहून घोषणा दिल्या आहेत. आम्हाला कोणीही घोषणा देण्यास सांगितले नव्हते.

यावेळी माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशीदेखील संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन देशभरातलं वातावरण तापलेलं आहे. याबाबत वाड्रा यांनादेखील माध्यमांनी विचारणा केली. परंतु यावर वाड्रा म्हणाले की, मी मंदिरात देवदर्शनासाठी आलो आहे, चांगलं दर्शनदेखील झालं आहे. त्यामुळे यावेळी मी राजकारणावर काहीही बोलणार नाही.