कल्याण : मल्टिप्लेक्समधील समोशामध्ये चक्क कपडा आढळल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या प्रकारानंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन समोसे विक्रेत्याला मारहाण केली.


कल्याण पश्चिमेच्या सर्वोदय मॉलमध्ये असलेल्या एस एम 5 मल्टिप्लेक्समध्ये हा प्रकार घडला. प्रतिभा खरात ही तरुणी आज सकाळी तिच्या मैत्रिणीसोबत या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी आली होती. यावेळी तिने मल्टिप्लेक्समधून 90 रुपयाला दोन समोसे विकत घेतले.

समोसा खात असताना प्रतिभाला त्यात चक्क कपड्याचा तुकडा आढळला. त्यामुळे तिने समोसे विक्रेत्याला जाब विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे तिने मनसे कार्यकर्त्यांना बोलावलं.

मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी समोसे विकणाऱ्या तरुणाला कानशिलात लगावत कपडा असलेला समोसा जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मल्टिप्लेक्समध्ये मोठा गोंधळ उडाला.

एमएफसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांना पोलिस ठाण्यात नेत हा वाद शांत केला. मात्र या प्रकारामुळे मल्टिप्लेक्समध्ये चढ्या दराने खाद्यपदार्थ विकले जात असूनही ते किती निकृष्ट दर्जाचे असतात, हे समोर आलं आहे.