मुंबई: ड्रगचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई अडकत चालली आहे. तरुणाईला ड्रग्सच्या जाळ्यात ओढण्यासाठी एमडी किंवा म्याव-म्याव ड्रग विक्रेत्यांनी आता नवी शक्कल लढवली आहे. यासाठी मुंबईत काही सुंदर तरुणींचा वापर होत असल्याचं वृत्त मिड-डेनं दिलं आहे.


कॉलेजमधील काही सुदंर तरुणी ज्या भावनिकदृष्ट्या कमकुवत असतात त्यांना हाताशी धरुन आपला गोरखधंदा वाढविण्याचं काम ड्रग विक्रेते करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची माहिती एका तरुण-तरुणीनं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) दिली.

या दोघांनी आपआपल्या पालकांसह एनसीबीच्या कार्यालयात जाऊन या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यांच्याकडे मदतही मागितली.

दरम्यान, याबाबत बोलताना एनसीबीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'प्रामुख्याने द. मुंबईतील असलेले जे ड्रग विक्रेते हे सर्वात आधी सुंदर दिसणाऱ्या आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या तरुण-तरुणींना आपलं सावज बनवतात. त्यानंतर त्यांच्याच मदतीनं आपलं जाळं वाढविण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा ते अशा सुंदर मुलींना ड्रगच्या आहारी नेतात. त्यानंतर त्यांनाच ड्रग विकण्यास भाग पाडतात.'

असं शोधलं जातं सावज!

ड्रग विक्रेत्यांनी आता ही नवी मोडस ऑपरेंडी सुरु केली आहे. सर्वात आधी ते कॉलेज कॅम्पसमध्ये सुंदर तरुणींना आणि त्यांच्या मित्रांना हेरुन ठेवतात.

‘ज्या तरुणीनं एनसीबीला या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली ती दिसायला सुंदर आहे. पण भावनिकदृष्ट्या तेवढीच कमकुवत आहे. तिच्या कौटुंबिक आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे तिला ड्रग्जच्या विळख्यात ओढणं ड्रग विक्रेत्यांना फारच सोपं गेलं.' असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

'सुरुवातीला काही दिवस हे ड्रग विक्रेते अशा सुंदर तरुणींना म्याव-म्याव हे ड्रग मोफत देतात. 'हे असं औषध आहे की, ज्यानं तुमचा ताण प्रचंड हलका होईल.' असं त्यांना सांगितलं जातं. एकदा का तरुणी ड्रगच्या आहारी गेल्या की, त्यानंतर हे विक्रेते त्यांना आपल्याकडील ड्रग विकण्यास भाग पाडतात. जर तुम्ही हे विकलं तरच तुम्हाला आणखी ड्रग मिळेल. अशी अट घातली जाते.' अशी धक्कादायक माहिती नार्कोटिक्सच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘काही जणांना हे 'औषध' आहे. ज्यामुळे तुम्ही परीक्षेच्या वेळेस बरंच जागरण करु शकता.’ असं म्हणूनही विकलं जातं. तर अनेकांनी असंही सांगितलं जातं की, ‘याच्या सेवनानं चेहऱ्यावर एकप्रकारचा टवटवीतपणा दिसून येतो आणि तुमचा चेहरा कायम तजेलदार दिसतो.’ अशीही बतावणी केली जाते.

ड्रग्ससाठी घरातून चोरी

एनसीबीची मदत मागण्यासाठी आलेल्या तरुणीनं सांगितलेली कहाणी फारच धक्कादायक आहे. ड्रगच्या आहारी गेलेल्या तरुणीकडून ड्रग विक्रेत्यांनी एक ग्रॅम ड्रगसाठी 1,300 रुपयांची मागणी केली. त्यानंतर या मुलीनं तिच्या काकांचे पैसे चोरले. पण जेव्हा तिला कळलं की, आपली चोरी उघड झाली आहे. त्यानंतर तिनं घर सोडलं आणि आपल्या मित्रांकडे राहायला गेली. घरच्यांनी आपल्याला चटकन ओळखू नये यासाठी तिनं आपलं केसंही कापले. आपली मुलगी हरवली असल्याची तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रारही केली होती. मात्र, तिच्याजवळचे पैसे संपताच ती पुन्हा घरी परतली.

ती घरी जरी परतली असली तरी तिची ड्रग्सच्या विळख्यातून काही सुटका झाली नव्हती. त्यामुळे ड्रग्ससाठी पैसे आणायचे कुठून याचाच ही तरुणी विचार करत होती. याचवेळी ड्रग विक्रेत्यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढलं. या तरुणीनं एनसीबीला सांगितलं की, 'तुझ्या सुंदर दिसण्यानं तू कॉलेजमधील मुलांना तुझ्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना ड्रगच्या आहारी न्यायचं. तू जर असं केलंस तर आम्ही तुला मोफत ड्रग देऊ.'

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर एनसीबीनंही ड्रगची विक्री रोखण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच याबाबत कॉलेजमधील मुलांमध्येही जागरुकता निर्माण करणार असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.