कल्याण : पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीवर घरात घुसून धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मुलीने तब्बल 20 मिनिटं या हल्लेखोर मनोरुग्णाला प्रतिकार केला. आरडाओरड ऐकून आसपासच्या नागरिकांनी घरात जाऊन या मनोरुग्णाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. अनिल धिंडळे असे या मनिरुग्णाचे नाव असून तो कल्याण पश्चिमेकडील खडक पाडा परिसरात राहतो.


कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरातील हरिशचंद्र अपार्टमेंट या इमारतीमध्ये युवराज कोळी हे कुटुबांसह राहत असून ते मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात एएसआय म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी कोळी यांनी अनिल धिंगळे या मनोरुग्ण इसमास हटकले होते. याचा राग मनात धरून या मनोरुग्णाने आज दुपारच्या सुमाराला कोळी यांची मुलगी सुषमा ही एका खाजगी शिकवणी वर्गातून घरच्या दिशेने येत असताना त्या मनोरुग्ण इसमाने तिचा घरापर्यंत पाठलाग केला.

सुषमा घरी गेल्या नंतर काही क्षणात हा मनोरुग्ण तिच्या घरासमोर दाखल झाला. त्याने तिच्या घराचा दरवाजा वाजवला सुषमाने दरवाजा उघताच त्याने तिच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने हल्ला चढवला. मात्र, सुषमाने धाडस करत या हल्लेखोर मनोरुगणाला प्रतिकार केला. तब्बल 20 मिनटांहून अधिक काळ दोघांमध्ये झटापट सुरु होती.

या दरम्यान सुषमाने जे हातात येईल त्या वस्तूने या मनोरुग्णाला झोडण्यास सुरूवात केली. आरडाओरड एकूण आसपासच्या नागरिकांनी घरात धाव घेत लॅच तोडून या मनोरुग्णाला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

या हल्ल्यात सुषमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला चिकनघर परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.