तुम्हाला सोशल मीडियावर खळखळून हसवणारे मीम्स लाखो रुपये कमावून देतात
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2018 01:28 PM (IST)
सोशल मीडियावर मीम्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. पण हे मीम्स बनवून ते विकणारं एक मोठं नेटवर्क आहे. या माध्यमातून लाखो रुपये कमावले जात आहेत.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मीम बनवा आणि लाख रुपये कमवा! सोशल मीडियाच्या विश्वात मीम हे एक असे अस्त्र आहे ज्याचा वापर राजकीय रिंगणात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर 2014 च्या निवडणुकीत प्रचारासाठी मीमचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचं आपल्याला दिसून आलं. पण तुम्हाला माहित आहे का, मीम बनवून विकण्याचा एक फार मोठा व्यापार झाला आहे. कधी हे मीम्स आपल्याला हसवतात... तर कधी कोणत्या व्यक्तीचं जगणं अवघड करतात. मोठे-मोठे अभिनेते आणि राजकीय नेते आपल्याला या मीमद्वारे करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगचे शिकार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण असे मीम बनवणं आणि ट्रोल्स बनवणं आज एक फुल टाईम जॉब झाला आहे. एबीपी माझाने अशाच एका मीम मेकरशी बातचीत केली आणि या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं. मीम तयार करुन ते ऑनलाईन विकता येतात, कंत्राट घेता येतं किंवा वैयक्तिकपणे ते विकता येतात, असं आम्हाला मीम मेकरकडून समजलं. अनेक जण मित्र मंडळींच्या मनोरंजनासाठीही मीम बनवतात. सोशल मीडियावर आज 70 टक्के मीम आणि ट्रोल्स पाहायला मिळतात. युवा पिढी मोठ्या प्रमाणात या मिम्सकडे आकर्षित होताना पाहायला मिळत आहे. पण मीमचे हे माध्यम एवढे आकर्षित करणारे का आहे? निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष याचा वापर कशा प्रकारे करतात? याच प्रश्नांची उत्तरं मुंबई विद्यापीठातील माध्यम आणि संवाद शाखेचे डॉ. संजय रानडे यांनी दिली आहेत. मीम्समुळे कमी शब्दांमध्ये जास्त माहिती देता येते हा सर्वात मोठा फायदा आहे. कमी शब्दात जास्त माहिती मिळाल्यामुळे हे माध्यमा आकर्षक बनलंय. निवडणुकांमध्येही मीमचा वापर आता वाढणार आहे. राजकीयदृष्ट्या मीमचा मोठा फायदा येत्या काळात होईल, असं संजय रानडे यांचं म्हणणं आहे. मीम बनवून लाखो रुपये कमावणारं एक मोठं नेटवर्क देशभरात आहे. मुंबईतही हेच पाहायला मिळतंय. निवडणुका जवळ येतील तसं आपल्याला सोशल मीडियावर मिम्सचे प्रमाण वाढताना दिसून येईल यात शंका नाही.