मुंबई : मुंबईतील तिनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांच्या दुरुस्ती तसंच इतर डागडूजीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ठाणे ते कल्याणमध्ये डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून सकाळी 10.20 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत डाऊन फास्टवरून सुटणाऱ्या सर्व लोकलना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबा देण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे
हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे होणार आहेत. कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत लोकलची वाहतूक बंद असेल.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई स्थानकांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत अप आणि डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक आहे. अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक भाईंदर ते वसईमध्ये अप आणि डाऊन फास्ट मार्गावरून चालविण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात येतील.