मुंबई : आज (रविवार) रेल्वेच्या पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक घेण्यात येणार होता, मात्र तो रद्द करण्यात आला आहे. हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड यार्डात कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड यार्डात काम असल्याने पश्चिम रेल्वेवर फारसा परिणाम होणार नाही.


पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. वसई रोड यार्डातील कामानिमित्त मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मालवाहतुकीवर परिणाम होईल, मात्र लोकल वाहतूक सुरळीत सुरु राहील.

हार्बर मार्ग

हार्बर रेल्वेवर वडाळा ते मानखुर्द दरम्यान सकाळी 11.10 ते संध्याकाळी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉग घेतला जाणार आहे. सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मानखुर्द ते पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.