मुंबई : मुंबई महापालिकेच्या वाहनतळापासून एक किमी अंतराच्या आत बेकायदेशीररित्या गाडी पार्क केल्यास एक ते दहा हजार दंड वसूल करण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर पडला आहे.
मुंबईत असणार्या लाखो वाहनांसाठी महापालिकेची पार्किंग व्यवस्था अपुरी पडणार आहे. त्यामुळे दंडासाठी एक किमी अंतराची हद्द संबंधित विभागातील परिस्थितीनुसार 100 ते 500 मीटर केल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी घेत प्रशासनाला सुधारित प्रस्ताव आणण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे 7 जुलैपासून होणारी दंडवसुली लांबणीवर पडणार आहे. मुंबईत पार्किंगला शिस्त लावण्यासाठी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या पार्किंगपासून एक किमी अंतराच्या आत पार्किंग केल्यास 7 जुलैपासून एक ते दहा हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र या निर्णयाला शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी विरोध केला. या पार्श्वभूमीवर पाहणी करून आवश्यकतेनुसार दंडासाठी पालिकेच्या पार्किंगपासून एक ते 500 मीटरपर्यंत अंतर करून तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौरांकडून देण्यात आले आहेत.
मुबंई महापालिकेने पार्किंगसाठी 146 वाहनतळ उपलब्ध करून दिले आहेत. या वाहनतळांवर 34 हजार 808 वाहने पार्क करता येऊ शकतात. मात्र ही उपलब्ध वाहनतळांची व्यवस्था पाहता संबंधित ठिकाणी एकावेळी हजारो वाहने आल्यास ही व्यवस्था अपुरी पडू शकते.