मुंबई : मध्य रेल्वेच्या मध्य (Central) आणि हार्बर (Harbour) मार्गावर रविवार 19 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीये. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार असा हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्ग पूर्णपणे ठप्प राहणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक रद्द करण्यात आला होता. पण या रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच हार्बर मार्गावर सकाळी 11.16 ते दुपारी 4.40 असा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डीएन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 हा ब्लॉक घेतला जाणार होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाणार होत्या. त्यानंतर कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.
घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे या हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल, बेलापूरपर्यंत सकाळी 11.16 ते 4.47 वाजेपर्यंत, तसेच वाशी, बेलापूर, पनवेल, बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी 10.48 ते 4.43 पर्यंत सेवा पूर्णपणे बंद राहतील.
त्याचप्रमाणे ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल ते कुर्ला दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरुन विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलीये. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक घेणं आवश्यक असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यत आलं आहे.
हेही वाचा :
Navi Mumbai Metro : नवी मुंबईच्या मेट्रोचे ग्रहण सुटले, आजपासून प्रवाशांसाठी सेवा सुरू