मुंबई : मुंबईच्या तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभाल, ओव्हरहेड वायर तसंच सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर, हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येतील.

मध्य रेल्वे

मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी 10.08 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे अप फास्ट मार्गावरील लोकल नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्टेशनवर थांबणार नाहीत.

 

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सकाळी 9.52 ते दुपारी 4.39 वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक बंद राहणार आहे.

वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी या काळात लोकल धावणार नाहीत. तसंच सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 10.38 ते दुपारी 4.13 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.

रविवारी हार्बर मार्गावरील प्रवासी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्रवास करु शकतील.

 

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मरिन लाइन्स ते माहिम स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो मार्गावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक मरिन लाइन्स ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवरून चालवली जाईल.

महालक्ष्मी, एलफिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड स्थानकांत स्लो मार्गावरील लोकल थांबणार नाहीत. ब्लॉकदरम्यान सर्व लोकल गाड्या लोअर परेल आणि माहिम स्थानकांत दोनदा थांबतील. रविवारी उपनगरीय मार्गावरील काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत.