मुंबई : मुंबईतील तीनही मुख्य रेल्वेमार्गांवर आज रविवारी 25 मार्च रोजी विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड वायरची देखभाल आणि रुळांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर कल्याण ते ठाणे, पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदर आणि हार्बर रेल्वेवर वाशी ते बेलापूर स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच ट्रान्स हार्बरवरील तुर्भे ते नेरुळ स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 04.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मेगाब्लॉक काळात कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यानची अप स्लो मार्गावरील वाहतूक अप फास्ट मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे या स्लो लोकलना ठाकुर्ली कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवरुन प्रवासाची मुभा असेल.

पश्चिम रेल्वे

दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक काळात या स्थानकांदरम्यानची स्लो मार्गावरील वाहतूक जलद मार्गांवर वळवण्यात आली आहे. मेगाब्लॉकमुळे भाईंदर स्थानकातून सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेमार्गावर वाशी ते बेलापूर अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे हार्बर डाऊन मार्गावरील वडाळ्याहून बेलापूर/पनवेलसाठी सकाळी 09.08 वाजल्यापासून संध्याकाळी 05.30 वाजेपर्यंत सर्व लोकल रद्द असतील. तर हार्बर अप मार्गावर बेलापूर/पनवेलहून सीएसएमटीसाठी निघणाऱ्या लोकल सकाळी 9.44 ते संध्याकाळी 05.30 वाजेपर्यंत बंद राहतील.

मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी-वाशी आणि पनवेल-बेलापूर स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.

 ट्रान्स हार्बर रेल्वे

ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावरही आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे ते नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे ठाणे-पनवेल मार्गावरील वाहतूक सकाळी 09.39 वाजल्यापासून संध्याकाळी 05.34 वाजेपर्यंत बंद राहील. तर पनवेल-ठाणे मार्गावरील वाहतूक सकाळी 09.48 ते संध्याकाळी 05.57 वाजेपर्यंत रद्द राहतील.