मुंबई: फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच, शिवसेनेनेही आपली टीकेची मालिका कायम ठेवली आहे.

एकनाथ खडसे यांनी मंत्रालायत मोठा उंदीर घोटाळ्याचा दावा केल्यानंतर, आज शिवसेनेने ‘सामना’तून टीकास्त्र सोडलं.

मंत्रालय नाही तर उंदरालय,  अशा मथळ्याखाली सामनात अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

उंदीर घोटाळ्याने सरकारची तिजोरी कुरतडलीच, पण सध्याच्या राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले, अशी घणाघाती टीका सामनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या कथित स्वच्छ प्रशासनाला बिळं पडली आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू उंदरालय झालं आहे. मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे, असे मिश्किल टोमणे सामनातून लागवण्यात आले आहेत.

सामनात नेमकं काय म्हटलंय?

उंदीर घोटाळा हा एक नवीन शब्द यानिमित्ताने शब्दकोशात समाविष्ट झाला आहे. इतरही काही नवी विशेषणे, म्हणी, वाप्रचार प्रचारात येण्याची चिन्हे आहेत. ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ असे म्हणण्याऐवजी भविष्यात ‘तुझ्या उसाला लागंल उंदीर’ असे म्हटले जाईल. ‘कागदी घोडे’ असा शब्द सरकारी कामकाजासंदर्भात वापरला जातो. त्याची जागा ‘कागदी उंदीर’ हा शब्द घेईल.

उंदीर घोटाळय़ाने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत, येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन ‘भुसभुशीत’ झाली आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षाचेच लोक करीत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’ झाले आहे. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळय़ाचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण ‘अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे!

संबंधित बातम्या

मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप


उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही