मुंबई : एकीकडे युतीत तणावाचं वातावरण असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा झाली आहे. गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटनानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. गेल्या दोन दिवसात दोघांमध्ये दुसऱ्यांदा अशाप्रकारे गुफ्तगू झाली आहे.


शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमन पॉईंट येथील प्रशासकीय शाखेच्या उद्घाटनानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रशासकीय शाखेचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर दोघांनी त्याच इमारतीतील एका हॉटेलमध्ये अल्पोपहार घेत सुमारे 15 मिनिटं चर्चा केली.


मात्र दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन नेत्यांमधील या भेटीमुळे, शिवसेनेने सभागृहात नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधीच्या या गाठीभेटींना विशेष महत्व असल्याचंही बोललं जातं आहे.


दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी महापौर बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी दोन नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली होती.