मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी वाढवावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन दिले. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरवताना सरकारने केवळ अवघ्या नऊ दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. हा कालावधी विरोधी पक्षांना मान्य नाही. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच इतरही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळावा अशी मागणी केली.
यासाठी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा, अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र सरकारने अवघ्या नऊ दिवसांचे कामकाज निश्चित करुन अधिवेशन संपवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी घेऊन दोन्ही विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांशी सविस्तर चर्चा केली.
राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणाऱ्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आदींचा समावेश होता.