मुंबई : शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'झिरो'ला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सोमवारी न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आली. हायकोर्टाने 30 नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.

या सिनेमातील एका दृश्यात शाहरूखनं 'कृपाण'(छोटं शस्त्र) धारण केलं आहे. या प्रकारमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. हायकोर्टातील एक वकील अमृतपालसिंह खालसा यांनी ही याचिका सादर केली आहे.

या याचिकेत अभिनेता शाहरूख खान, सिनेमाच्या निर्मात्या गौरी खान आणि करूणा बडवाल, दिग्दर्शक आनंद एल. राय आणि रेड चिलीज प्रायव्हेट लिमिटेड आणि या सिनेमाला सर्टिफिकेट देणाऱ्या सीबीएफसीलाही प्रतिवादी करुन त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कृपाणचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे. तसेच शीख संस्कृतीत त्याला विशेष स्थान आहे. कुणीही कृपाण म्हणजेच छोटेखानी शस्त्र धारण करू शकत नाही. त्यासाठी काही धार्मिक विधी करून घेणं आवश्यक असतं, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

नुकतच या सिनेमाचं एक पोस्टरही लाँच करण्यात आलं. ज्यात चड्डी आणि बनियान घातलेला बुटका शाहरूख गळ्यात नोटांची माळ आणि अंगावर 'कृपाण' धारण केलेला दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हायकोर्टानं सीबीएफसीला निर्देश देत ही आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून हटवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.