मुंबई : हॉस्पिटल्समध्ये औषधांच्या होणाऱ्या तुटवड्यामुळे अनेकदा रुग्णांचे हाल होतात. ही परिस्थितीत बदलण्यासाठी आता हाफकिनने पुढाकार घेतला आहे. लोकांना किफायतशीर दरात औषधगोळ्या मिळाव्यात, यासाठी औषध आणि गोळ्यांच्या निर्मितीचा नवीन विभाग ‘हाफकिन’मध्ये सुरु करण्यात येणार आहे.
या विभागाचे काम अंतिम टप्प्यात असून काही किरकोळ बाबींसाठी हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे या बाबींची पूर्तता करुन हा प्रकल्प सुरू करण्यात यावा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. रावल यांनी शुक्रवारी हाफकिन या संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या विभागाला भेट दिली.
राज्यात श्वानदंशाचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे महामंडळाने हाती घेतलेल्या टिश्युकल्चर तंत्रज्ञानावर आधारीत जास्त सुरक्षित आणि गुणवत्ताधारक रेबीज लस उत्पादनाच्या प्रकल्पास आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असंही रावल यांनी स्पष्ट केलं आहे. महामंडळामार्फत सर्पविषाचे मानकीकरण करण्याचे देश पातळीवरील केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी 23 कोटी 18 लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे.
याशिवाय, विष संशोधन केंद्र सुरु करण्याची मागणी महामंडळाने केली आहे. या सर्व प्रकल्पांसाठी राज्य शासनामार्फत सहकार्य करण्याबरोबरच केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा करु, असं आश्वासन रावल यावेळी दिलं.