मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन आठव्या दिवशीही सुरुच आहे. सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी एक आठवड्याची मुदत दिली असली तरी मराठा विद्यार्थ्यांनी मात्र आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतलेलं नाही. सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही आणि आमचा वैद्यकीय प्रवेश निश्चित होत नाही तोर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.


वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेशासाठीची मुदत वाढवली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकारची अध्यादेश आणण्याची तयारी आहे, परंतु आचारसंहिता अडसर ठरत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. मात्र गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतरही रात्री उशिरापर्यंत हे विद्यार्थी आझाद मैदानातच बसून होते.


गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल (सोमवार, 13 मे) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री स्वत: या प्रकरणात लक्ष घालत असल्याची माहिती गिरीश महाजनांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिली. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आजपर्यंत महाविद्यालयाची निवड करावी लागणार होती. परंतु आरक्षणाच्या घोळामुळे मराठा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची निवड करण्यात अडचण आली. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने ही मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची निवड करण्यासाठी अजून एक आठवडा मिळणार आहे.


विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरेंची भेट


पदव्युत्तर वैद्यकीय आंदोलक विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने काल राज ठाकरेंची भेट घेतली. राज्य सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने राज ठाकरे यांच्याकडे साकडं घालण्यासाठी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला गेलं होतं. विद्यार्थ्यांनी आपलं निवेदन राज ठाकरे यांना सादर केलं. राज ठाकरेंनी देखील त्यांच्या मागण्या आणि समस्या समजून घेत त्यावर मार्ग काढू असं आश्वासन दिलं.


सरकारला सर्वोतोपरी मदत करु : अजित पवार


माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या विद्यार्थ्यांची आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. आम्ही सरकारला याबाबत मदत करत असून लवकरात लवकर कसा तोडगा निघेल यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. जर अध्यादेश काढून प्रश्न सुटत असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत आचारसंहितेचं कारण पुढे आलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज चर्चा करुन लवकर हा तिढा सुटेल यासाठी प्रयत्न करत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.



आणखी वाचा