मुंबई : लोकलमधून खाली पडून गंभीररित्या जखमी झालेल्या तेजश्री वैद्यला मदत करण्यासाठी एबीपी माझाने केलेल्या आवाहनाला मुंबई क्रिकेट असोसिएसशनच्या बीकेसी क्लबने प्रतिसाद दिला आहे. एमसीएच्या बीकेसीतल 300 कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार तेजश्रीच्या उपचारासाठी देण्याचं ठरवलं आहे.


बीकेसीतील एमसीएच्या क्लब हाऊसचे उपाध्यक्ष अजय देसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली.

तीन महिन्यांपूर्वी तेजश्री वैद्य शीव ते माटुंगा प्रवासादरम्यान लोकलमधून पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तेजश्रीला अजूनही सगळ्या संवेदना नाहीत. मोठ्या मुश्किलीने ती डावा पाय हलवू शकते आणि डावा डोळा उघडते.

तिच्या उपचारावर हजारो रुपये खर्च होतात. पण रेल्वेकडून अद्यापही तिला आर्थिक मदत मिळाली नाही. तिच्यावर उपचार करण्यासाठी एक थेरपी सुचविण्यात आलीय. ती लोकमान्य टिळक रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे तिला रहेजा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या थेरपीमध्य एका विशिष्ट प्रकारच्या मशिनमध्ये तिला काही वेळासाठी ठेवण्यात येते. ही प्रक्रिया करण्यासाठी दिवसाचा खर्च 14 हजार रुपये आहे.

संबंधित बातमी : रेल्वेतून पडलेली तेजश्री 3 महिन्यांपासून कोमात, तुमची मदत हवी!