नवी मुंबई : सायन-पनवेल हायवेवरील खड्ड्यांनी दुसरा बळी घेतला आहे. तुर्भे येथील उड्डाणपुलावरून मुंबईच्या दिशेने जाताना दुचाकीस्वाराचा खड्डे चुकवताना पडून मृत्यू झाला आहे. तर मागे बसलेला दुसरा तरूण गंभीर जखमी झाला.


गेल्या आठवड्यात या मार्गावर नेरुळ येथे अशाच पद्धतीने दुचाकीवरुन पडून एकाचा जीव गेला होता. 5 जुलै रोजी किल्ला गावठाण येथील उड्डाण पुलावरून नेरूळच्या दिशेने येताना इम्रान खुर्शीद यांचा खड्ड्यात दुचाकी गेल्याने मृत्यू झाला होता.

सनी कुमार विश्वकर्मा हा दुचाकीवरुन मुंबईच्या दिशेने जात होता. तुर्भे येथील उड्डाणपुलावरून जाताना सायन-पनवेल हायवेवर पडलेल्या खड्ड्यात गाडी गेली. रात्री दोन वाजताची वेळ असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने सनीकुमार विश्वकर्मा हा दुचाकीवरुन पडला.

यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने रक्तस्त्राव झाला. त्यामुळे विश्वकुमार याचा मृत्यू झाला. तर मागे बसलेले कमलेश यादव जखमी झाले आहेत.

सायन-पनवेल हायवेची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये वाहनांचंही मोठं नुकसान होत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करुनही ठेकेदाराविरोधात कोणतीही कारवाई सरकारकडून होताना दिसत नाही.

दरम्यान, दोन जणांचा बळी जाऊनही अजून खड्डे बुजवण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. हे दोन बळी गेल्या दोन आठवड्यातच गेले आहेत. यापूर्वीही या रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सरकार आणखी किती जणांचा जीव जाण्याची वेळ पाहत आहे, असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत.