मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना 8 मार्च पासून एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. असं असताना अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली. मात्र, या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसून या व पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत.

Continues below advertisement

ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली किंवा ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आयसोलेशन रूमची वेगळी व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली आहे.

अकोला, अमरावती, नागपूर व विदर्भातील जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने विद्यार्थी परीक्षा कशी देणार? शिवाय इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशी मागणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात येत असून याबाबत अनेक पत्र विद्यापीठ प्रशासन व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सुद्धा 8 मार्च पासून सुरू होणारी एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी लागणार असल्याचे विद्यापीठकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Continues below advertisement