मुंबई : सध्या लसीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. मुंबईकरांना मोफत लस द्या अश्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी काल महापालिकेतल्या महापौर दालनाबाहेर आंदोलन केलं होतं. मात्र, या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना भाजपच्या नेत्यांचा अभ्यास कमी पडतोय अशी खोचक टिप्पणी करत विकत घेतल्या जाणाऱ्या लसीचे 150 रुपये केंद्राकडेच पाठवावे लागतात असा खुलासा केलाय.


मुंबईकरांना मोफत लस मिळावी यासाठी माझ्या केबीनबाहेर आंदोलन करण्याऐवजी केंद्राला हे 150 रुपये घेऊ नका असं सांगण्यास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजप नगरसेवरकांना सुचवले. खाजगी हॉस्पिटलमध्ये जी लस लोक 250 रुपयांना विकत घेतात त्यातील 150 रुपये केंद्राला जातात आणि 100 रुपये खाजगी हॉस्पिटल त्यांच्या व्यवस्थापनासाठी घेते. याव्यतिरीक्त महापालिका आणि राज्य सरकारच्या शासकिय लसिकरण केंद्रावर मोफत लसिकरण होते. मात्र, खाजगी रुग्णालयात ही लस 250 रुपये देऊन विकत घ्यावी लागते. त्यामुळे लस विकत घ्यायची असल्यास त्यातील 150 रुपये केंद्राकडे जातात.


आठवड्याच्या सुरुवातीला तीन दिवस पालिकेने लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस मिळणार नाही असे घोषित केले होते. याआधीही   लसींची कमतरता असल्यामुळे सर्व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण पूर्णत: थांबवले होते. त्यामुळे गेले 10 दिवस शासकीय केंद्रांवर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी उसळली. यामध्ये वरीष्ठ नागरिकांचे बरेच हाल झाले. लसीकरण केंद्रावरील उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जात आहे. तरीही वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून तातडीने सर्वांना मोफत लसीकरण करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्याची मागणी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली होती.


काय आहेत भाजपच्या मागण्या?



  • सर्व मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे.

  • 45 वर्षांवरील ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांची स्वतंत्र रांग लसीकरण केंद्रांवर लावण्याच्या सूचना द्याव्यात.

  • अतीवरिष्ठ नागरिक म्हणजेच 80 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांगेची सोय करावी.

  • 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस घ्यायचा असेल तर नोंदणीनंतर वॉक इन लसीकरण न करता कालबद्ध पूर्व नियोजित वेळेनुसारच लसीकरण करण्यात यावे. (Pre booked appointment)

  • 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणीनंतर आगावु निश्चित केलेल्या वेळेनुसारच (Pre booked appointment) लसीकरण करण्यात यावे.

  • मुंबईकरांचे लसीकरण लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी पुरेसा लसीचा पुरवठा प्रत्येक लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करावा.

  • सर्व लसीकरण केंद्रे किमान 12 तास आणि आवश्यक असेल, शक्य असेल तिथे 24 तास लसीकरणासाठी उघडी ठेवावीत. 

  • सर्व लसीकरणाची प्रक्रिया आगावु निश्चित केलेल्या वेळेनुसारच करावी.


मात्र, अश्या मागण्यांची आणि आंदोलनाची पूर्वकल्पना दिली असती तर  स्वतःही या आंदोलनात सहभागी झालो असतो आणि लसीचा पुरवठा न करणाऱ्या दिल्लीच्या केंद्र सरकारच्या दरबारी हे आंदोलन घेऊन गेलो असतो, असा टोला महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजप नगरसेवकांना लगावला.