Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारडून एप्रिल 2021 पासून ते सरकार कोसळण्याच्या दिवसापर्यंतच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच लावला आहे. काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली, तर काही निर्णय रद्दच करण्यात आले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष तसेच सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णयाचा समावेश आहे. या निर्णयावरून आज विधानसभेमध्ये विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत खोचक टोलेही लगावले. विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच छगन भुजबळ यांनी या निर्णयावरून सरकावर सडकून टीका केली. तसेच या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली.
तर मुख्यमंत्री सुद्धा का निवडत नाही?
अशा प्रकारचे निर्णय हे लोकशाहीला घातक असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. जर, तुम्ही नगराध्यक्ष आणि सरपंच जनतेनं निवडणार असाल, तर मुख्यमंत्री सुद्धा का निवडत नाही? अशी विचारणा अजित पवार यांनी केली. ते पुढे म्हणाले की, हा निर्णय फडणवीस सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय यशस्वी झाला नाही. आम्हीही लोकांमधून निवडून येत आहे असे सांगत अजित पवार यांनी या निर्णयाचे परिणाम सांगितले.
अजित पवार म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होत नाहीत किंवा पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. मात्र इतर निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होतात. त्यामुळे, ज्यांच्याकडे पैसा आहे, मनी मसल आहे त्यांचीच दहशत राहील. त्यामुळे हा पायंडा लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे हे बिल रद्द करण्यात यावे.
अजित पवारांनी दिले लातूरचे उदाहरण
अजित पवार यांनी या संदर्भात बोलताना काही उदाहरणे दिली. लातूरचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, जनार्दन पवार हे राष्ट्रवादीचे नेते होते ते जनतेमधून निवडून आले. मात्र, त्याठिकाणी बहुमत काँग्रेसचं होतं. त्यामुळे बॉडी काँग्रेसची आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा जनतेमधून निवडून आला होता. त्यामुळे विकासकामे करताना फार अडचण निर्माण होते.
अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
अजित पवार यांनी या निर्णयावरून सरकारवर हल्ला चढवलाच, पण एकनाथ शिंदे यांनाही खोचक टोला लगावला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून अशा पद्धतीने निवडून यायचं आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून हे योग्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मात्र, तुम्ही आमदार घेऊन गेला आणि मुख्यमंत्री झाला. आमदारांना अधिकार नसते, तर तुम्ही मुख्यमंत्री झाला नसता, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या