मुंबई : मुंबईच्या दादर परिसरातील महापौर बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. महापालिका सभागृहात यासंबंधी निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. मात्र नव्या महापौरांना कोणती जागा मिळणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
दादरच्या महापौर बंगल्याचा भूखंड बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 'स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यास'कडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मुंबई महापालिका सभागृहात कोणत्याही चर्चेविना अंतिम प्रस्ताव पारित करण्यात आला. याआधी सुधार समितीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
प्रस्तावानुसार मूंबई महापालिका 30 वर्षांसाठी एक रुपये इतक्या नाममात्र भाडेदरानं महापौर बंगल्याची जागा ट्रस्टकडे देणार आहे.
नव्या महापौरांना निवासासाठी कोणता बंगला देण्यात येणार, यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. सध्या भायखळ्यातील राणीच्या बागेतील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला किंवा पेडर रोडवरील आयुक्तांचा बंगला हा नव्या महापौरांना देण्यात येऊ शकेल, अशी चर्चा आहे.