मुंबई : "उशिरा का होईना शिवसेनेला मनसेचं म्हणणं पटलं. त्याचा आम्हाला आनंद आहे," असं  मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.


"मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अंतिम निर्णय आता राज ठाकरेच घेतील. राज ठाकरेंचा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, हे मी नक्की सांगू शकतो," असंही बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे शिवसेनेसमोर असलेला मुंबई महापालिकेतील बहुमताचा पेच मनसेच्या सात नगरसेवकांच्या साथीने सुटणार का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

निवडणुकीत कोणी-कोणाचाही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू असत नाही. राजकारणात लवचिकता महत्त्वाची असते. कोणत्यावेळी लवचिक व्हायचं हे कळायला हवं. शिवसेनेबाबत लवचिक व्हायचं की नाही हा निर्णय राज ठाकरे घेतील. मराठी हित केवळ आम्हीच बघायला हवं असं नाही. मराठी मतांमध्ये आम्ही फूट पाडतो असा आरोप आमच्यावर झाला. मग आता कुणी मराठी मतांमध्ये फूट पाडली? आता डोळे उघडले का?

आता दोन पक्षप्रमुख काय निर्णय घ्यायचा तो घेतील. आता ते दोघे भाऊ यापेक्षा दोन पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतील. माझी इच्छा काय आहे याला महत्त्व नाही. बाळासाहेबांच्या इच्छेचा सन्मान झाला नाही तिथे माझ्या इच्छेचं काय?

बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत