मुंबई : माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला मोठा तडा गेल्याने पूल वापरासाठी बंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुलाला तडा गेला होता, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेनं पूल वापरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.


पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी या पुलाचा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पुलाची लवकरात लवकर डागडुजी करून वापरासाठी खुला करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.





काही दिवसांपूर्वीच ग्रँट रोड स्थानक आणि नाना चौकाला जोडणाऱ्या पुलाला तडे गेले होते. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गांद्वारे वळवली होती. मात्र पुलावरील खड्डे व तडे गेलेल्या ठिकाणी डांबर आणि खडी टाकून पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. सध्या या पुलावरून वाहतूक सुरु आहे.


3 जुलै रोजी अंधेरी स्टेशनच्या विलेपार्ले एंडच्या बाजूला असलेला प्लॅटफॉर्म क्र. 8 आणि 9 च्या दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळला होता. या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक दिवसभर ठप्प झाल्याने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. या पूल दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता.