कल्याण : मटका किंग जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना याची शुक्रवारी (31 जुलै) रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आपल्या कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेशवर गोळीबार केला. जिग्नेश ठक्करवर गोळीबार करणारे कोण होते याचा तपास कल्याणचे एमएफसी पोलीस करत आहेत.
जिग्नेश ठक्कर याचे ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि पत्त्यांचे क्लब आहेत. शिवाय तो क्रिकेट मॅचवरही सट्टा घेत असल्याची माहिती आहे. जिग्नेश शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन परिसरातील नीलम गल्लीत आपल्या कार्यालयाबाहेर बसला होता. तिथून तो जायला निघताच आधीपासून दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्या छातीत चार गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर जिग्नेशला कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या घटनेची माहिती मिळताच एमएफसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात बकेली असून काही पथकं हल्लेखोरांच्या शोधात रवाना केली आहेत. जिग्नेशवर गोळीबार करणारे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक हल्लेखोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सध्या या सगळ्याचा तपास सुरु आहे.
पोलिसांनी जिग्नेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. तर आरोपींच्या शोधासाठी पोलीस परिसरात चौकशी करणार आहे. तसंच परिसरातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजी तपासले जाणार आहेत.