ठाणे : गणित विषय सोपा करण्यासाठी ठाण्यात गणिताची अनोखी प्रयोगशाळा भरली आहे. गणित विषयाचं नाव काढलं की अनेकांना हा विषय किचकट, अवघड वाटतो. गणित सोडवणं हे कठीण काम आहे, असं मनाशी ठरवून आपण या विषयाकडे दुर्लक्ष करतो. पण आता गणित विषय सोपा व्हावा, विद्यार्थ्यांना या विषयाबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी गणित प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे.
ठाण्यातील रा. ज. ठाकूर या मराठी शाळेत गणित शिकवणाऱ्या प्रधान कुलकर्णी या शिक्षकांनी ही प्रयोगशाळा तयार केली आहे. विषय ज्याप्रकारे प्रात्यक्षिक करून त्याच्यातील संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजतात आणि विषय सोपा वाटायला लागतो, अगदी गणितात सुद्धा अशी प्रयोगशाळा प्रधान कुलकर्णी यांनी सुरु करायचं ठरवलं. जेणेकरून विद्यार्थ्यांना गणित प्रात्यक्षिक करून गणित विषयाच्या अवघड वाटणाऱ्या संभ्रम निर्माण करणाऱ्या संकल्पना सोप्या वाटायला लागतील.
या गणितीय प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे एकूण 20 प्रोजेक्ट तयार केले आहेत. हे प्रयोग तयार करताना विद्यार्थ्यांना आधी समजून सांगून त्याच्या मदतीने हे प्रोजेक्ट तयार केले आहेत. यामध्ये त्रिकोणमितीचे उदाहरण हाताच्या पंजाच्या साहाय्याने कसे लक्षात ठेवावे, परिमिती दोराच्या मोजमाप घेऊन कशी काढायची, गुणाकार-भागाकाराचे नियम चुंबक, कॉईनच्या साहाय्याने कसे समजून घ्यायचे, असे अनेक प्रयोग या प्रयोग शाळेत पाहायला मिळत आहेत.
विद्यार्थ्यांना गुणाकार, भागाकार करताना (+) आणि (-) संख्या असताना नेमकं कोणतं चिन्ह द्यावं ? दशांशचिन्ह, भागाकार, गुणाकार करताना दशांशचिन्ह उत्तराच्या कोणत्या स्थानी द्यावे? असे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न या गणिती प्रयोगशाळेमध्ये सरावाने कायमचे सोडवले जात आहेत.
गणितीय शाळेमधील निवडक प्रोजेक्ट हे शिक्षणाची वारी प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. त्यानंतर या प्रयोग शाळेचा विद्यार्थ्यांकडून वाढता प्रतिसाद पाहता इतर शाळांचे विद्यार्थी सुद्धा या गणितीय प्रयोगशाळेची मागणी आपल्या शाळेत करत आहेत