मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे चिरंजीव अमित यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. राज यांनी उद्धव ठाकरेंना अमित यांच्या लग्नाचे निमंत्रण दिले. तसेच डल्लास अपार्टमेंटमध्ये जाऊन जयदेव ठाकरेंनाही लग्नाचे निमंत्रण दिले आहे. येत्या 27 जानेवारीला अमित यांचा विवाह मिताली बोरूडेसोबत होणार आहे.


राज यांनी अमित यांच्या लग्नाचं पहिलं निमंत्रण रतन टाटा यांना दिलं आहे. राज ठाकरे सर्वांना घरी जाऊन, भेटून लग्न सोहळ्याचे निमंत्रण देत आहेत. लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे त्यांना भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे.


येत्या 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातील 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 11 डिसेंबर 2017 रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता.


कोण आहे मिताली बोरुडे?


मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन - डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.


PHOTO | राज ठाकरेंकडून अमित यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगीचरणी