नवी मुंबई : राज्य सरकारने कृर्षी मालावरचे नियमन काढून शेतमालाच्या विक्रिसाठी शेतकरी ते थेट ग्राहक ही सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे एपीएमसीचे (मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती) कार्यक्षेत्र मार्केट आवारापुरतेच मर्यादित राहिले आहे, त्यामुळे एपीएमसी मार्केटमधील व्यापारी आणि माथाडी कामगारांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे एपीएमसीच्या अस्तित्वासाठी एपीएमसीमधील पाच मार्केटचे व्यापारी आणि माथाडी कामगारांनी आज बंद पुकारला आहे.
एपीएमसीच्या पाच मार्केट्समध्ये रोज किमान २५ कोटी रुपयांची उलाढाल होते. बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. ७२ हेक्टर जमिनीवर वसलेल्या बाजार समितीने १ लाखपेक्षा जास्त नागरिकांना रोजगार मिळवून दिला आहे. यामध्ये माथाडी कामगार, वारणार, मेहता, व्यापारी, व्यापाऱ्यांकडील मदतनीस, रोजंदारीवर काम करणारे कामगार, वाहतूकदार, चालक, वाहकांचा समावेश आहे. नियमनमुक्तीमुळे या सर्वांचे नुकसान होणार आहे
नियमनमुक्तीमुळे मार्केट बाहेर व्यापार करणाऱ्यांना कोणताही कर लागत नसताना एपीएमसी मधील व्यापारी मात्र कराच्या बोजाखाली येत आहेत. त्यामुळे आम्हालाही नियमनातून मुक्त करा अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे.