नवी मुंबई : मुंबईमध्ये येत्या 9 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या तयारीसाठी नवी मुंबईमध्ये बैठका सुरु आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उतरण्याचा निर्णय माथाडी कामगार युनियनने घेतला आहे.

वाशीमधील माथाडी भवनात माथाडी कामगार आणि व्यापारी वर्गाची बैठक पार पडली. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी 1981 साली विधानभवनावर मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. त्यामुळे आरक्षण मागणीची सुरुवात करणाऱ्या आण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी कामगार युनियनने यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये काम करणारे माथाडी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. सुमारे एक लाखाच्यावर ही संख्या जाणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, 9 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चा असल्याने माथाडी कामगारांबरोबर एपीएमसीमधील व्यापारी वर्ग सामील होणार असल्याने एपीएमसी एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.