मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2018 ची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ सरोद वादक अमजद अली खान यांना यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्सच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात.


मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आशाताईंच्या 75 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव या पुरस्काराने होणार आहे.

सिनेसृष्टीतील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा गौरव होणार आहे. खेर सध्या एफटीआयआयचं अध्यक्षपद भूषवत असून त्यांना आतापर्यंत पद्मश्री, पद्मभूषण प्रदान करुन केंद्र सरकारने सन्मानित केलं आहे. अनुपम खेर यांनी असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

उद्योगक्षेत्रातील कामगिरीसाठी धनंजय दातार यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील धनंजय दातार या तरुणाने जिद्दीने दुबईत छोटंसं किराणा स्टोअर्स सुरु केलं आणि पाहता पाहता त्यांच्या उद्योग समुहाच्या 23 शाखा झाल्या. दातार यांना दुबईच्या सुलतानाने 'मसाला किंग' ही उपाधी देऊन गौरवलं आहे.

'एबीपी माझा'चे संपादक राजीव खांडेकर यांना पत्रकारितेली योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते 'माझा'चं संपादकपद भूषवत असून जवळपास 25 वर्षांपासून राजीव खांडेकर पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्यातील अनेक मानाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.

याशिवाय कवी योगेश गौर यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी, शेखर सेन यांना नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी गौरवण्यात येणार आहे.

सर्वोत्कृष्ट नाटकाचा मोहन वाघ पुरस्कार 'अनन्या' या नाटकाला जाहीर झाला आहे. प्रताप फड लिखित-दिग्दर्शित अनन्या नाटकात अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. संकटांचा डोंगर कोसळूनही त्याला धीराने सामोरं जाणाऱ्या 'अनन्य'साधारण तरुणीची कथा या नाटकात रेखाटली आहे. 'अनन्या' नाटकाचा प्रयोग पाहून पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारतीताई यांनी ऋतुजाला गळ्यातली सोनसाखळी भेट देऊन तिचं कौतुक केलं होतं.