मुंबई : मुंबईत भाजपच्या 'कमल ज्योती संकल्प' अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मलबार हिल परिसरातील बाणगंगामध्ये करण्यात आली. यापूर्वी फक्त अमेरिकाच दहशतवादी तळांवर हल्ले करुन नेस्तनाबूत करायची, आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचं सिद्ध झालंय, असं फडणवीस यावेळी म्हणाले.


आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारच्या विविध योजना लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत लाभार्थींच्या हस्ते कमळाची पणती प्रज्वलित करुन बाणगंगेत सोडण्यात आल्या.

भारताने कधीच आपली सीमा वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. पण झालेल्या हल्ल्याचं चोख उत्तर नक्कीच दिले जाईल, याबाबत शंका नाही. आज दहशतवादी तळांवर हल्ला करुन देशाला धोका निर्माण करणाऱ्यांना वायुसेनेने नेस्तनाबूत केलं. यापूर्वी फक्त अमेरिका त्यांच्यावरील हल्ल्याचा बदला घ्यायची आणि आत घुसून वार करायची. त्यानंतर आज आपल्या देशाच्या सैन्यातही ते बळ असल्याचं सिद्ध झालंय, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

'आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदींनी आपण प्रधानसेवक असल्याचं पंतप्रधानपदी होताच सांगितले होतं. आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार होता. 'गरिबी हटाव'चा नारा दिला जायचा, पण कधी परिवर्तन घडताना दिसलं नाही', असं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी सोडलं.

नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा 34 कोटी बँक खाती जनधन योजनेअंतर्गत उघडून दिली. आज या खात्यांमध्ये 80 हजार कोटी रुपये थेट पोहचत आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी सांगितलं होतं, मी 1 रुपया दिल्लीतून पाठवला, तर 25 पैसे लोकांपर्यंत पोहचतात, पण मोदींनी 1 रुपया अख्खा पोहचवण्याची व्यवस्था आणली, असा दावाही फडणवीसांनी केला.

'वन रँक वन पेन्शन' योजना आम्ही लागू केली. या योजनेच्या माध्यमातून 35 हजार कोटी रुपये माजी सैनिकांना मिळवून दिले.
मुद्राच्या माध्यमातून 15 कोटी जणांना कर्ज मिळालं, असाही दावा फडणवीसांनी केला.

आजच्या कार्यक्रमाचा भाव वेगळा नाही, तर संवेदना प्रकट करण्याचा आहे. यामध्ये दया, उपकाराची भावना नाही, तर सेवा केल्याची भावना आहे. ज्यांच्यापर्यंत योजना पोहचल्या ते दीप प्रज्वलित करुन भावना व्यक्त करत आहेत, असंही फडणवीसांनी सांगितलं.