मुंबई : देशासाठी शहिद झालेल्या महाराष्ट्राच्या वीरपुत्रांनी अवघ्या देशाची मान उंच केलीच मात्र त्यांच्या वीरपत्नींनीही महाराष्ट्राच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला आहे. जम्मु काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करतांना वीरमरण आलेले शहिद मेजर कौस्तुभ राणे यांचं स्वप्नं आता त्यांच्या पत्नी कनिका राणे पुढे नेणार आहेत. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे या आता लवकरच लष्कराच्या गणवेशात दिसणार आहेत. त्यांनी लष्करातील अधिकारी पदासाठी असलेली परीक्षा उत्तीर्ण करुन लष्करात भरती होण्याच्या मार्गातला एक महत्वाचा टप्पा पार केला आहे.

7 ऑगस्ट 2018 ला काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आलं होतं.  त्यानंतर पतीचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लष्करात भरती होण्याची इच्छा त्यांच्या पत्नी कनिका राणे यांनी त्या वेळी व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी लष्कराती अधिकारी पदासाठी असलेली परीक्षा ही दिली. ही परीक्षा कनिका उत्तीर्ण झाल्या असून येत्या ऑक्टोबर महिन्यात चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत त्या प्रशिक्षणासाठी जाणार आहेत.



शहिद झालेल्या पतीच्या जागी जाऊन देशसेवेचं व्रत अखंड सुरु ठेवता यावं या इच्छेसाठी आता अनेक विरपत्नी पुढे येत आहेत. या प्रक्रीयेत अश्या वीरपत्नींना सामावून घेण्यासाठी एक जागा राखीव ठेवलेली असते. मात्र, या एका जागेसाठीही देशभरातल्या शहिद जवानांच्या पत्नींचे अर्ज मोठ्या संख्येनं येत असतात. एस.एस.बी ची परिक्षा उत्तीर्ण होऊन आता अनेक विरपत्नी चेन्नईत लष्कर भरतीचे प्रशिक्षण घेऊऩ लष्करी सेवेत दाखल होतात. महाराष्ट्रातून आतापर्यंत स्वाती महाडिक, गौरी महाडिक, कनिका राणे या तिघींनी आपल्या शहिद पतीच्या मार्गानंच जायचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करुन दाखवला.

कनिका राणेंची खंत
शहिद मेजर कौस्तुभ राणेंच्या वीरमरणानंतर राज्य सरकार कडून कनिका राणेंना नोकरी देण्यात आली होती. मात्र शहिदांची पत्नी म्हणून आम्हांला केवळ सहानुभुती नको सन्मानही द्या असं कनिका राणेचं म्हणणं आहे.  शहिदांच्या पत्नींना दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या 'क' आणि 'ड' वर्गातील असतात. उच्चविद्याविभुषीत आणि योग्य पात्रता असलेल्या महिलांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकऱ्या दिल्या जात नाहीत. केवळ तरतुद नाही म्हणून कनिका राणेंना एम.बी.ए. ची पदवी असुनही कमी पात्रतेची नोकरी देण्यात आली होती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

दहशतवाद्यांचा खात्मा करणारच
कनिका राणे सध्या  प्रोजेक्ट मॅनेजर पदावर काम करत आहेत. मात्र भारतीय सैन्य दलात रुजू झाल्यावर सीमेवर जाऊन 'कॉम्बॅट ऑपरेशन' करणाऱ्या पथकात सामील व्हायची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक शारिरीक क्षमता पूर्ण करण्याची जोरदार तयारी त्यांनी सुरु केली आहे.