मुंबई : मुंबई हायकोर्टाच्या कानउघडणीनंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. संपावर जाणं डॉक्टरांच्या पेशाला शोभत नाही, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायधीश मंजुळा चेल्लूर यांनी सुनावलं. यावेळी मार्डचे अधिकारी आणि अनेक निवासी डॉक्टर हायकोर्टात उपस्थित होते.

"तुमची वैद्यकीय शपथ आठवा. डॉक्टरी पेशाला संपावर जाणं शोभत नाही. तुमच्या गैरउपस्थितीत रुग्णांचे हाल होत आहेत.", असे न्यायाधीशांनी डॉक्टरांना सुनावलं. त्याचवेळी, कामावर तातडीने रुजू व्हा, तुमच्याविरोधातील सर्व नोटिसा मागे घ्यायला लावू, असंही हायकोर्टाने सांगितलं.

दरम्यान, दर 15 दिवसांनी मुंबई हायकोर्टात यावर सुनावणी होईल. शिवाय, वेळोवेळी हायकोर्ट राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेणार आहे.

सरकारने हायकोर्टात काय माहिती दिली?

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये 1100 सशस्त्र सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाईल, असे राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात सांगण्यात आले. त्यावेळी, 500 सुरक्षारक्षक येत्या 5 एप्रिलपर्यंत, तर उर्वरित 600 सुरक्षारक्षक 13 एप्रिलपर्यंत रुग्णालयात तैनात करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. यावर राज्य सरकारनेही सहमती दर्शवली.

रुग्णालयात रुग्णाबरोबर केवळ दोनच नातेवाईक राहतील, असा नियम करण्याची सूचनाही हायकोर्टाने राज्य सराकरला केली.

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची अवस्थाही वाईट असून, त्यांना राहण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले.