नवी मुंबई : बंदुकीचा धाक दाखवून एका मराठी वृत्तवाहिनीच्या अँकरला लुटल्याची घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर घडली आहे. गिरीश निकम (वय 41 वर्ष)असं वृत्तनिवेदकाचं नाव आहे. पुण्यातील स्वारगेटहून खासगी प्रवासी कारने खारघरला येताना हा प्रकार घडला. महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांना लुटण्याची महिन्याभरातील ही पाचवी घटना आहे.


मराठी वृत्तवाहिनीत न्यूज अँकर असलेले गिरीश निकम हे खारघर सेक्टर-12 मध्ये राहतात. वैद्यकीय उपचारांसाठी गिरीश निकम मागील सोमवारी पुण्यात गेले होते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा खारघर परतण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात गेले. रात्री दहाच्या सुमारास स्वारगेट एसटी डेपोमध्ये ते बसची वाट पाहत असताना, एका व्यक्तीने त्याच्याजवळ खाजगी प्रवासी कार असून त्यात फक्त एकाच प्रवाशाची जागा शिल्लक असल्याचं सांगितलं. घरी पोहोचण्यास जास्त उशीर होऊ नये, यासाठी गिरीश यांनीही खासगी वाहनाने खारघरला जाण्यास तयारी दाखवली.

गिरीश पांढऱ्या रंगाच्या एक्सेन्ट कारमध्ये जाऊन बसले. कारमध्ये चालकासह चार जण बसले होते. त्यानंतर ती कार मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना, तळेगाव इथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. त्यानंतर पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर कार चालकाने लंघुशंकेच्या निमित्ताने कार थांबवली.

यावेळी चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती, गिरीश यांच्या बाजूला आला आणि त्यांच्या कमरेला बंदूक लावून मारहाण केली. त्यानंतर स्वत:जवळील पैसे तसंच इतर वस्तू दे अन्यथा जीवे मारु, अशी धमकी दिली. शिवाय त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल फोन तसंच रोख रक्कम असलेलं पाकिट जबरदस्तीने काढून घेतलं. त्यानंतर लुटारुंनी गिरीशचे एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली कार्डचा पासवर्ड विचारुन घेतला. लुटारुंनी काही किलोमीटर अंतरावर कार थांबवून गिरीशच्या एटीएम कार्डचा वापर करुन त्याच्या खात्यातील 41 हजारांची रोख रक्कम काढून घेतली.

यानंतर चोरट्यांनी गिरीश यांना त्यांचा मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड परत देऊन त्याला कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यावर सोडून पलायन केलं. त्यानंतर गिरीशने डोळ्यावरची पट्टी काढून मोबाईल फोनवरुन आपल्या मित्रांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लुटारुंनी त्याच्या मोबाईलमधील दोन्ही सिम कार्ड काढून घेतल्याचं त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने एका रिक्षा चालकाची मदत घेऊन कळंबोली पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी अज्ञात चौकडीवर जबरी चोरीचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई- पुणे शहराच्या दरम्यान खाजगी गाडीने प्रवास करताना याच महिन्याभरात प्रवाशांना दमदाटी करुन, शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या पाच घटना समोर आल्या आहेत. नवी मुंबई, पुणे आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीसांच्या हाती काही संशयित आरोपींचे फोटो आणि सीसीटीव्ही फूटेज लागले आहे. आरोपींकडून चोरीच्या गाडींचा वापर केला जात असून एक्स्प्रेसवेला प्रवास करताना गाडीची नंबर प्लेट आणि स्वत:चे कपडे बदलले जात आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ओळख पटू नये यासाठी या शक्कल लढवल्या जात आहेत.