मुंबई : बडोद्यात आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मराठी भाषेच्या भल्यासाठी धरणं आंदोलन करणार आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आपल्या सहा मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 24 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचं निश्चित झालं.


काय आहेत 'मराठीच्या भल्यासाठी' व्यासपीठाच्या मागण्या?

1) इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सक्तीने मराठी शिकवण्यासाठी तामिळनाडू आणि तेलंगणाच्या धर्तीवर मराठी शिक्षण कायदा आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा जूनच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करणे

2) मराठी शाळा बंद पडू नयेत आणि त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी मराठी शाळांचे गुणवत्तेच्या संदर्भात सक्षमीकरण करणे, त्याचा कृती आराखडा तयार करणे आणि भरीव आर्थिक तरतूद करणे

3) मुंबईत मराठी भाषा भवन बांधणे किंवा शासन खरेदी करत अडलेल्या एअर इंडियाच्या जागेत चार मजले देणे

4) शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणे

5) शिक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मराठी शाळांचा बृहद आराखडा अंमलात आणणे आणि त्या अंतर्गत सर्व मराठी शाळांना मंजुरी देणे

6) मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांच्या भेटीला लेखकांचे शिष्टमंडळ नेणे

या बैठकीला 'मराठीच्या भल्यासाठी' व्यासपीठाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, तसेच दीपक पवार, उषा तांबे, चंद्रशेखर गोखले, प्रसाद मसुरकर हे पदाधिकारी उपस्थित होते.