ठाणे : संपूर्ण जगातील अवघी तेविसावी आणि भारतातील पहिलीच केस असणाऱ्या अतिदुर्मिळ आजाराने ग्रस्त ठाण्यातील प्रियांशच्या मदतीला संपूर्ण मराठी सिनेसृष्टी धावली असून त्यांनी दानशूर नागरिकांना देखील मदतीचे आवाहन केले आहे. 


अवघ्या 18 महिन्यांच्या चिमुकल्या प्रियांशला AHDS म्हणजेच अॅलन हर्नडन डडली सिंड्रोम नामक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. 'X' गुणसूत्रांशी निगडीत असल्याने हा आजार केवळ मुलांमध्येच आढळतो. या आजारात बाळाच्या हालचालीसाठी आवश्यक असणाऱ्या थायरॉईड हार्मोन्स मेंदूपर्यंत पोहोचण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते आणि वय वाढले तरी बाळाला मान धरण्यास कठीण जाते. 




हा आजार अतिदुर्मिळ असल्याने जगभरात यावर संशोधन सुरु आहे. या आजारावरील गोळ्या केवळ नेदरलँड या देशातून आयात कराव्या लागतात, ज्याचा खर्च लाखात आहे. प्रियांशवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते त्याला ऑक्युपेशनल थेरपीची गरज असून पुढील उपचारासाठी जवळपास सात ते आठ लाख रुपये इतका प्रचंड खर्च येणार आहे. प्रियांशच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे अत्यंत बेताची झाली आहे. अतुल विरकर हे स्वतः नट असून अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत. ते स्वतः पूजा सांगतात. अनेक सिरीयलचे मुहूर्त केलेल्या अतुल विरकरांचे दोन्ही उद्योग कोरोनामुळे बंद असल्याने त्यांना एवढा मोठा खर्च शक्य नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी हात जोडून सर्व दानशूर नागरिकांकडे आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी कळकळीचे आवाहन केलं आहे.


अतुल विरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मराठी कलाकार पुढे आले असून त्यांनी देखील व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून मदतीचे भावनिक आवाहन केले आहे. वरद विजय चव्हाण, मनीषा केळकर, रमेश वाणी, जयवंत वाडकर, उमेश बोळके, आदिती सारंगधर, विजय पाटकर, कांचन पगारे या कलाकारांना प्रियांशसाठी मदतीचं आवाहन केलं आहे.