मुंबई : फटाके फोडल्याशिवाय तुमची आमची दिवाळी पूर्ण होतच नाही. मात्र आपली ही आतषबाजी अनेकांच्या जीवावर बेतत आहे. फटाक्यांच्या आवाजानं कित्येकांचं जग उद्धवस्त केलं आहे, याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. कारण फटाक्यांचं सावज ठरलेले बोलू शकत नाहीत... सांगू शकत नाहीत... सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नाही...


कुणाचा डोळा फुटला आहे... कुणाच्या मानेला जखम झाली आहे... तर कुणाच्या कानातून रक्त वाहतं... मुक्या प्राण्यांची ही अवस्था केलीय दिवाळीच्या फटाक्यांनी.. दिवाळीच्या 4 दिवसात अचानकपणे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या प्राण्यांच्या संख्या वाढली आहे.

काही प्राणीप्रेमी जखमी झालेले पक्षी, प्राणी घेऊन येतात. मात्र ज्यांचा जीव गेला आहे, किंवा ज्यांच्या जखमांची आपल्याला माहिती नाही, अशांचा आकडा फार मोठा असू शकतो.  फटाक्यांच्या धडकी भरवणाऱ्या आवाजानं आपल्याही कानठळ्या बसतात, तिथं मुक्या
प्राण्यांचं काय होत असेल याचा फक्त विचार करुन बघा.

खरं तर दिन दिन दिवाळी... गाई म्हशी ओवाळी... असं म्हणत भूतदया जपणारी आपली संस्कृती... आपण पोळ्याला बैलाचेही ऋण फेडतो.. कुत्र्या-मांजरांचे अतोनात लाड करतो..  मग दिवाळीच्या आनंदात त्यांच्या जीवाशी खेळ का करतो? हा प्रश्न दर दिवाळीनंतर का विचारावा लागत असेल?