मुंबई : मराठा समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींनीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत मराठा समाजाच्या संघटनांनी शिवस्मारक समितीचं पुनर्गठन करण्याची मागणी केली.
शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर मराठा समाजाने आक्षेप घेतला. टीम झाली पण त्यांनी काम केलं नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठा संघटनांना यात सामील करुन घेतलं नसल्याचं सांगतानाच मेटेंची कार्यपद्धत मान्य नसल्याचंही मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींतर्फे सांगण्यात आलं.
एकूण 43 मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली होती. छावा संघटना, मराठा आरक्षण समन्वय समिती, ताराराणी ब्रिगेड प्रदेश, शंभूराजे युवा क्रांती संघटना, शेतकरी मराठा सेवा संघ यासारख्या संघटनांचा समावेश होता.
विनायक मेटे यांनी शिवस्मारक भूमीपूजनच्या वेळी नाराजी नाट्य केलं होतं. मात्र अडीच वर्षात एकही बैठक झाली नाही, मराठा समाज संघटनेला विचारात घेतलं नाही, असा दावा बैठकीत करण्यात आला.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होईल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार जातीच्या आधारावर मत मागू शकत नाही. त्यामुळे 15 तारखेला होणाऱ्या बैठकीत सर्व गोष्टींबाबत चर्चा करु, असं सांगण्यात आलं.