ठाणे: राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न खितपत पडून राहिला आहे. यावर मराठा समाजाच्या वतीने ठाण्यात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला नोकरीत आरक्षण दिल्याचं लेखी आश्वासन द्यावं अशी प्रमुख मागणी मराठा समाजाने या आंदोलनातून केली आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. परंतू मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आमचा विश्वास नसल्याचा आरोप मराठा समाजने केला आहे. जोपर्यंत लेखी स्वरूपात आरक्षण जाहीर केलं जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका मराठा समाजानं घेतली आहे.

आरक्षण नसल्यानं मराठा युवकांचं मोठं नुकसान

आरक्षण नसल्यानं मराठा समाजाच्या युवकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मोठ्या दुजाभावाला सामोरं जावं लागतं असल्याची खदखद मराठा समाजाच्या युवकांत आहे. कॉलेजच्या फी पासून ते सरकारी नोकरीच्या शुल्कापर्यंत सगळीकडे हा दुजाभाव दिसून येतो.

तसेच आरक्षण नसल्याने मराठा समाजाच्या युवकांना नोकऱ्या मिळत नसल्याचे मत मराठा युवकांनी व्यक्त केले.