no confidence motion मुंबई: अविश्वास प्रस्तावावरुन शिवसेनेतील गोंधळ कायम आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला शिवसेना खासदारांनी गैरहजेरी लावली. मात्र शिवसेनेचा व्हीप कोणी जारी केला यावरुन आता सेनेतच संभ्रम आहे.


व्हीप जारी करण्यावरुन शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचा व्हीप अस्तित्त्वातच नव्हता, कुणीतरी खोडसाळपणे खोटा व्हीप जारी केला, असं शिवसेनेचे प्रतोद, खासदार चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला सांगितलं.

अविश्वास ठरावादरम्यान शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा रंगली होती. मग शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. काल विश्वासदर्शक ठरावावेळी सर्व खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहावं यासाठी शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला होता.

शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीने तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला होता. "अनिवार्य रुप से उपस्थित रहकर सरकार के पक्ष का समर्थन करें", अशी या व्हीपमधली शेवटची ओळ होती.

मात्र आता हा व्हीप शिवसेनेने जारी केलाच नव्हता असं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

शिवसेनेने कोणताही व्हीप जारी केला नव्हता. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. आज जो पक्षादेश आला तोच निर्णय झाला. त्यानुसार शिवसेना खासदार आजच्या कामकाजापासून दूर राहिले. अनुपस्थित राहिले.