मुंबई : शिवसेना-भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या स्नेहभोजनाला अनेक आमदारांची दांडी मारल्याचं चित्र पाहायाला मिळालं. अधिवेशन सुरू असूनही अनेक आमदारांनी फिरवली पाठ फिरवल्यानं विविध चर्चाना उधाण आलं आहे.
भाजपचे 122, शिवसेनेचे 63 आणि विधानपरिषदेच्या 34 आमदारांपैकी केवळ 125 आमदारांची स्नेहभोजनाला हजेरी लावली. युती झाली असली तरी अनेक आमदारांच्या मतदारसंघातील कामे, महामंडळांचं वाटप, विकास निधीचे प्रस्ताव रखडल्याने आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. गेली साडेचार वर्ष सेना-भाजप आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले, मात्र आता त्यांना एकत्र आणण्यात आमदारांचा कस लागणार आहे.
उद्धव ठाकरे
अविचारी लोक एकत्र येऊ शकतात, मग समविचारी लोक का एकत्र येऊ शकत नाहीत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमादरम्यान विचारला. हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलो आहोत. त्यामुळे एकत्रितरित्या निवडणुकीच्या कामाला लागा, हे भगवं वर्ष आहे. युती सरकारने योजना चांगल्या बनवल्या आहेत, मात्र त्या यंत्रणेमार्फत लोकापर्यत पोहोचल्या पाहिजेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
युतीची घोषणा झाल्यानंतर सर्वसामान्य जनता आणि प्रशासनात असलेला संभ्रम दूर झाला आहे. विरोधकांनी शिवसेना किंवा भाजपवर टीका केली तर ती टीका युतीवरची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आपल्याला जे राजकारण करायचं ते युतीचं राजकारण करायचं आहे. एकमेकांना सोबत घेऊन राजकारण करायचं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मागील निवडणुकीत जेवढ्या जागा युतीने जिंकल्या त्यापैकी एकही जागेवर आपला पराभव होईल असं मला दिसत नाही. उलट त्याहून अधिक जागा आपण जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलो पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विशेषतः शरद पवारांना ही निवडणूक हातातून चालली आहे हे लक्षात आलं आहे. आपण अनुभवाने पवारांपेक्षा कमी असलो तरी त्यांना सगळ्या गोष्टीत मात देऊ शकतो. त्यामुळे ते अनेक हातखंडे वापरतील. मात्र आपण त्यांच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकायचे नाही, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला.