मुंबई : मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा तपास करणार्‍या महाराष्ट्र एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये विनायक शिंदे नावाच्या निलंबित पोलिस हवालदाराला आणि नरेश गोरे नावाच्या क्रिकेट बुकीचा समावेश आहे. टेक्नोलॉजीची मदत घेऊन एटीएसने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


एपीआय सचिन वाझे हे टेक्निकल एक्सपर्ट मानले जातात. परंतु या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने देखील टेक्नोलॉजीच मदत घेतली आणि आरोपींनी अटक केली. सूत्रांनी सांगितले की, 4 मार्च रोजी रात्री  8 ते साडेआठ वाजेपर्यंत मनसुखला अखेरचा व्हॉट्सअॅप कॉल आला, जो सापडणे सोपे नव्हते. यामुळे एटीएसने महाराष्ट्रातील सर्व बड्या टेक्नोलॉजी एक्सपर्ट्ची मदत घेतली. 


एटीएसने आधी मनसुख ठाण्यातील घोडबंदरला गेला त्यावेळचा डेटा मिळवला. ज्यामध्ये एटीएसच्या हाती 1000 हून अधिक मोबाईल क्रमांक आले. त्यांची तपासणी करुनही एटीएसच्या हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर एटीएसच्या पथकाने मनसुखला आलेल्या सर्व व्हॉट्सअॅप कॉलची माहिती बाहेर काढली आणि कसा तरी या पथकाने मनसुखचा शेवटचा व्हॉट्सअॅप कॉल ट्रेस केला.


एटीएसने त्या व्यक्तीचा शोध सुरु केला, ज्याने मनसुख यांना तावडे बोलत असल्याचं सांगून भेटायला बोलवलं होतं. त्यानंतर पथकाला कळले की हा क्रमांक गुजरातच्या अहमदाबादमध्ये नोंदवला गेला आहे. एटीएसच्या पथकाने तिथे छापा टाकला. दरम्यान एटीएसने नरेश गोरे याला ताब्यात घेतलं, सोबत 15 व्होडाफोन सिमकार्ड जप्त केले. नरेश गोरेने काही कार्ड सचिन वाझे यांना आणि विनायक शिंदेला एक सिम कार्ड दिलं होते. विनायक त्याच कार्डचा वापर करून वाझे यांच्याशी बोलत असे. अशाच एका कार्डचा वापर करून शिंदेने मनसुखला व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला होता आणि स्वत: ला तावडे असल्याचं सांगितलं. एटीएस याचाही तपास करत आहे की मनसुख कोणत्या तावडेला भेटायला गेले होते? हा तावडे नेमका आहे कोण?


एटीएसला तपासात कळले की मनसुख यांची हत्या झाली त्यावेळी विनायक शिंदे तेथे होता. एटीएसच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, मनसुखला ठार मारण्यापासून ते मृतदेह खाडीत फेकेपर्यंतच्या कार्यात 11 किंवा त्याहून अधिक लोक सहभागी झाले होते. या 11 पैकी 3 पोलिस कर्मचारी गाडीमध्ये उपस्थित होते. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश गोरे याला मुंबईतून तर विनायक शिंदेला एटीएसचे निरीक्षक दया नाईक यांनी कळवा येथून अटक केली.