मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये परमबीर सिंग यांनी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना आपल्या निवासस्थानी बोलवल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र, या संदर्भात राष्ट्रवादीकडून काही दावे करण्यात आलेले आहेत. तसेच काही रिपोर्ट देखील समोर आले असून त्याद्वारे माजी पोलीस आयुक्त यांच्या पत्रातील दाव्याबाबत राष्ट्रवादीने शंका उपस्थित केली आहे. 


या कागदपत्रांवरुन परमबीर सिंग यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीकडून उपस्थित केला जातोय. अनिल देशमुख यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे अनिल देशमुख हे त्या महिन्यात रुग्णालयात दाखल होते.  




अनिल देशमुख हे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला नागपुरात होते. चार तारखेला त्याची तब्येत खराब झाली, त्यांनी कोरोना चाचणी केली आणि पाच तारखेपासून ते रुग्णालयात दाखल झाले, असा दावा करण्यात आला आहे. 




गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही : जयंत पाटील


अनिल देशमुख पाच ते सोळा फेब्रुवारीला नागपूरच्या रुग्णालयात होते. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर ते मुंबईत आले. पण 16 फेब्रुवारी ते पुढचे 10 दिवस अनिल देशमुख हे मुंबईतील निवासस्थानी विलगिकरणात होते. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरू होत असल्याने गृहमंत्री म्हणून अधिवेशन तयारी आणि ब्रिफिंगच्या कामाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 26 तारखेपासून सुरुवात केली.




गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामधून बाहेर आल्यावरही विलगीकरणात होते. यामुळं राष्ट्रवादीनं दावा केला आहे की, अशा वेळी सचिन वाझे कधी भेटले आणि कधी गृहमंत्र्यांशी चर्चा केली ज्याचा उल्लेख परमबीर सिंग यांनी केला आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खालील कागदपत्रं ही गृहमंत्र्यांच्या फेब्रुवारी महिन्यातील कामकाज आणि मेडिकल रिपोर्ट दाखवत आहेत. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त यांच्या पत्रातील दाव्याबाबत राष्ट्रवादीकडून शंका उपस्थित केली जात आहे.