'आज कोणतीही राजकीय चर्चा नव्हती. मी 1992 मध्ये अयोध्येला गेलो होतो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे मला निरोप देण्यासाठी सेनाभवनला आले होते. आमचं विमान अयोध्येला न थांबता कोलकात्याला गेलं होतं. मी पुन्हा अयोध्येला आलो, मात्र तोपर्यंत अयोध्येची तारीख उलटून गेली होती. त्यामुळे आम्हाला जाता आलं नव्हतं, आमचं अपुरं राहिलेलं कार्य आज उद्धव ठाकरे पूर्ण करायला गेले आहेत, त्यांना शुभेच्छा देणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी मातोश्रीवर आलो होतो' अशी आठवण सांगताना मनोहर जोशींना गहिवरुन आलं.
संपूर्ण ठाकरे कुटुंबीय ज्या कार्यासाठी बाहेर पडले आहेत, त्यात त्यांना यश मिळो, इतकीच आमची प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना आहे, असं सांगतानाही मनोहर जोशी यांना अश्रू अनावर झाले. मनोहर जोशी यांनी 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत दिली.
इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही आहेत.ठाकरे कुटुंबातून उत्तर भारतामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दोनवेळा गेले होते. एकदा कोर्टाच्या कामासाठी तर दुसऱ्यांदा 'सहारा'चे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या लग्नासाठी ते उत्तर प्रदेशात गेले होते.
हिंदुत्व हे कधीच मारक ठरत नाही, हिंदुत्व हे यशाकडेच जातं. निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळेल, अशी खात्रीही मनोहर जोशींनी व्यक्त केली. आजकाल निवडणुका होतात, तेव्हा जशी हवा असते, त्यानुसार मतदान होतं. आमचा तो उद्देश नाही, हिंदू एकत्र यावेत, हिंदुत्व वाढावं आणि हिंदुस्थान हे नाव सार्थ व्हावं, हे आपलं उद्दिष्ट असल्याचंही जोशी म्हणाले.
अयोध्या वारीनंतर मतदारांचं परिवर्तन होईल, असा विश्वासही मनोहर जोशींना वाटतो. हिंदू एकत्र यावे ही आमची भूमिका आहे, राजकारण नव्हे. भाजप जर हिंदुत्ववादी पक्ष असेल आणि प्रचारासाठी हा मुद्दा घेणार असेल, तर आम्ही पुन्हा एकत्र काम करु, असे संकेतही मनोहर जोशींनी दिले. मतांच्या राजकारणासाठी ज्यांच्या विरोधात बोलायचं त्यांच्या गळ्यात गळा घालायचा, हे आम्हाला मुळीच पसंत नाही, शिवसेना जे बोलते तेच करुन दाखवते, असंही मनोहर जोशी म्हणाले.
पाहा संपूर्ण मुलाखत :