मुंबई : शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेला डिवचलं आहे. 'अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिशात' असं लिहिलेले पोस्टर्स मनसेने शिवाजी पार्क परिसरातील सेना भवनाच्या समोरच झळकवली आहेत.


शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये रंगणारं पोस्टरयुद्ध नवीन नाही. यापूर्वीही शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी करुन मनसेने अनेकवेळा बाण सोडले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक पोस्टरबाजी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही अयोध्येला जात आहेत. ठाकरे कुटुंब सकाळी 11 वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावरुन रवाना होणार असून दुपारी 2 वाजता फैजाबाद विमानतळावर उतरतील.

निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा राम मंदिराचा मुद्दा उचलला जात आहे. शिवसेनेनेही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याचं दिसत आहे. शिवसेनेने अयोध्येत रॅलीचं आयोजन केलं आहे. अयोध्येत उद्या (रविवारी) उद्धव ठाकरे सभेला संबोधित करतील.

हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तर राम मंदिरावरुन भाजप-शिवसेनेचा पोरखेळ सुरु असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.